Tuesday, 20 March 2018

विश्वाची कोडी सोडवताना... (स्टीवन हॉकिंग यांच्या TED talk चा अनुवाद)

आपल्या विश्वापेक्षा, या ब्रह्मांडापेक्षा अजस्त्र आणि पुरातन असं काहीच नाही. या संदर्भात मला ज्या खास कोड्यांवर-प्रश्नांवर बोलायला आवडतं, ते म्हणजे : ही पृथ्वीवरची जीवसृष्टी कुठून आली? विश्वाची उत्पत्ती कशी झाली? या विश्वात आपण एकटेच आहोत का? की पृथ्वीपलीकडेही जीवसृष्टी अस्तित्वात असेल? मानवजातीचं भवितव्य आहे तरी काय?
अगदी 1920 पर्यंत आपला असा समज होता की विश्व स्थिर आहे, त्यात कालानुरूप बदल होत नाहीत. मात्र संशोधनानंतर लक्षात आले की विश्व हे सतत प्रसरण पावत आहे. आपल्यापासून कित्येक प्रकाशवर्षे अंतरांवर असणाऱ्या आकाशगंगा आपल्यापासून अधिकाधिक दूरच जात राहिल्या आहेत. याचाच अर्थ, कधीकाळी त्या एकमेकांच्या जवळ, आत्तापेक्षा कमी अंतरावर असल्या पाहिजेत. अब्जावधी वर्षांच्या भूतकाळात डोकावून पाहिलं तर लक्षात येतं की या सगळ्या अवकाशीय गोष्टी एकेकाळी चक्क एकमेकींना चिकटून होत्या, साधारण 15 अब्ज वर्षांपूर्वी एकाच बिंदूत एकवटल्या होत्या... हेच ते ‘बिग-बँग’, विश्वाच्या उत्पत्तीचा क्षण!
पण या बिग-बँगच्या ही आधी काही होतं का? जर नसेल तर विश्वाची निर्मिती कशी झाली? ती “बिंग बँग”च्या रुपात झाली तर झाली पण मग ती आता आपल्याला दिसते तशीच का झाली? आपल्याला असं वाटायचं की विश्वाच्या निर्मितीच्या सिद्धांताचे दोन भाग होऊ शकतात. पहिल्या भागात,  मॅक्सवेलची समीकरणे (Maxwell’s Equations) आणि सामान्य सापेक्षता सिद्धांत (General Theory of Relativity) आपल्याला विश्वाच्या उत्पत्तीची गणिते, त्याची एका बिंदूत एकवटलेली अवस्था समजावून देतात. पण त्याला पूरक असणारा दुसरा भाग म्हणजे विश्वाची अगदी सुरुवातीची अवस्था कशी होती याबद्दलचा प्रश्न, जो अजूनही चर्चेत नव्हता.
पहिल्या भागासंदर्भात बोलायचे झाले तर आपण त्यात चांगली प्रगती केली आहे. काही मोजक्या-टोकाच्या अवस्था वगळल्या तर आपल्याकडे विश्वाच्या उत्क्रांतीच्या नियमांविषयी बरेच ज्ञान आहे. परंतु अगदी आता-आतापर्यंत विश्वाच्या अगदी सुरुवातीच्या स्थितीबद्दल आपल्याला फार काही सांगता येत नव्हतं. पण विश्वाच्या उत्क्रांतीचे नियम आणि विश्वाची सुरुवातीची अवस्था ही विभागणी, काळ (Time) आणि अवकाश (Space) या एकमेकांपासून पूर्ण वेगळ्या आणि स्वतंत्र संकल्पना आहेत यावर अवलंबून आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर अगदी टोकाच्या अवस्थेत सामान्य सापेक्षता सिद्धांत आणि पुंजवाद (Quantum Theory) हे काळ हा अवकाशाचाच एक आयाम असल्याचे सांगतात. त्यामुळे या स्थितीत काळ आणि अवकाश यात काही फरकच उरत नाही आणि विश्वाच्या उत्क्रांतीचे नियम आपल्याला विश्वाच्या सुरुवातीच्या स्थितीबद्दलही सांगू शकतात. (म्हणजे) विश्व स्वतःचे स्वतः शून्यातून निर्माण होऊ शकते.
महत्वाचे म्हणजे विश्वाची निर्मिती ज्या निरनिराळ्या टप्प्यांमध्ये झाली, त्यांची शक्याशक्यता आपण गणिती भाषेत मांडू शकतो. शिवाय, अलीकडेच WMAP उपग्रहाने “कॉस्मिक मायक्रोव्हेव बॅकग्राऊँड”च्या स्वरुपात विश्वाच्या मुलभूत अवस्थांबद्दल महत्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. आपण वर्तवलेले गणिती आडाखे आणि WMAP ची निरीक्षणे अगदी तंतोतंत जुळतात, यातून विश्वाच्या प्राथमिक अवस्थांबद्दलचा आपला अंदाज आणखी सबळ होत जातो. विश्वनिर्मितीचे कोडे हे आपण अशारितीने सोडवत आणले आहे, त्यामुळे मला वाटते की आपण या विश्वाचे पेटंट घ्यायला हवे की काय! तसे केले तर प्रत्येकाकडून स्वत:च्या अस्तित्वासाठी घाऊक शुल्क आकारायला हवेच!
आता मी दुसऱ्या एका मोठ्या प्रश्नाकडे वळतो: या विश्वात आपण एकटेच आहोत का? की जीवसृष्टी आणखी कुठे अस्तित्वात आहे? पृथ्वीवर जीवनाची सुरुवात उत्स्फूर्तपणे झाली असे आपण मानतो.त्यामुळे इथे अस्तित्वात यायला, जगायला अनुकूल असलेली परिस्थिती इतर ग्रहांवर असायला आणि त्यातले अनेक (ग्रह) आपल्या आकाशगंगेत असायलाही (गणितीदृष्ट्या) काहीच हरकत नाही.
पण पहिला जीव कसा तयार झाला या विषयी आपण अनभिज्ञ आहोत. जीवनाची सुरुवात कशी झाली याच्या शक्यता दर्शवणारे दोन प्रत्यक्षदर्शी पुरावे आपल्याकडे आहेत. पहिला पुरावा म्हणजे 3.5 अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या शैवालाचे जीवाश्म. पृथ्वीची निर्मिती साधारण 4.6 अब्ज वर्षांपूर्वी झाली खरी पण सुरुवातीची 50 कोटी वर्षे ती खूपच उष्ण अवस्थेत होती. त्यामुळे त्या काळात जीवनाची शक्यता उद्भवत नाही, पण त्यानंतर काही काळातच पृथ्वीवर जीवनाची सुरुवात व्हायला काही हरकत नव्हती आणि तसे झालेले दिसतेही. पृथ्वीसारख्या ग्रहांचे 10 अब्ज वर्षं वगैरे कालावधीचे आयुष्य लक्षात घेता इथे जीवसृष्टीची सुरुवात फारच लवकर झाली. म्हणूनच गणितीच्या दृष्टीने पहायचे झाले तर पृथ्वीसारख्या इतर ग्रहांवरदेखील जीवन असण्याची शक्यता जास्त आहे. ही शक्यता खरोखरच अगदी कमी असती तर या 10 अब्ज वर्षांपैकी बराचसा काळ जीवनाची सुरुवात होण्यामध्येच गेला असता. पण आपल्याकडचे सर्व पुरावे पाहता तसे दिसत नाही.
असे असतानाही एकाही परग्रहवासियाने आपली अजून तरी भेट घेतलेली नाही. उडत्या तबकड्या/ यु.एफ.ओ. (Unidentified Flying Object) संबंधित बातम्यांना मी अर्थातच मोडीत काढतो आहे. अशा गोष्टी फक्त विचित्र, विक्षिप्त लोकांनाच का बरे दिसतात? हेच माझ्यासाठी एक मोठे कोडे आहे! जर असे रिपोर्ट दडपून टाकणे आणि परग्रहवासियांनी सोबत आणलेली वैज्ञानिक माहिती स्वतःपुरतीच राखून ठेवणे असे काही सरकारी षड्यंत्र असेल तर हे आतापर्यंतचे विलक्षण निरुपयोगी धोरण आहे असेच म्हणावे लागेल. SETI (Search for extraterrestrial Intelligence) सारख्या अत्याधुनिक शोधमोहिमांनी जंग-जंग पछाडूनसुद्धा परग्रहवासियांच्या एकाही दूरदर्शन ‘क्विझ शो’बद्दल आतापर्यंत ऐकायला मिळालेले नाही! यावरून म्हणता येईल की निदान शंभरेक प्रकाशवर्षे त्रिज्येच्या अंतरात तरी ‘आपल्या एवढा विकासाचा टप्पा गाठणारे’ परग्रहवासी कदाचित अस्तित्वात नाहीत. त्यामुळे "उद्या तुमचे परग्रहवासियांकडून अपहरण झाले तर! त्यासाठी आधीच विमा उतरवून घ्या." अशी जाहिरात करून विमा कंपन्यांनी विमे विकायला सुरुवात केली तरी त्या अजिबात घाट्यात जाणार नाहीत...!
आता मी एका शेवटच्या प्रश्नाकडे येतो: मानवजातीचे भवितव्य काय? जर आपण खरोखरच या आकाशगंगेतील एकमेव बुद्धिमान जीव असू तर आपले अस्तित्व कायम टिकून राहील अशी व्यवस्था आपणच केली पाहिजे. परंतु आपण तर मानवी इतिहासाच्या अतिशय धोकादायक काळात प्रवेश करत आहोत. आपली लोकसंख्या आणि पृथ्वीवरील मर्यादित स्त्रोतांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढत चाललेत. त्याचबरोबर आपल्या तांत्रिक कौशल्याच्या जोरावर आपण पर्यावरणामध्ये चांगले-वाईट बदल घडवून आणत आहोत. जगण्या-वाचण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत स्वार्थी आणि आक्रमक वृत्ती इतर सजीवांइतक्याच आपल्या जनुकांमध्येही पहिल्यापासून होत्या आणि त्या आजही तितक्याच टिकून आहेत. त्यामुळे येत्या काही शतकांमध्ये येऊ घातलेल्या आपत्ती टाळणे कठीण आहे, मग पुढच्या हजारो किंवा लाखो वर्षांची तर गोष्टच सोडा.
माझ्या मते, मानवजातीच्या दीर्घायुष्यासाठी एकच संधी आहे, ती म्हणजे फक्त पृथ्वीपुरता मर्यादित विचार न करता वास्तव्यासाठी अंतराळाचाही विचार करणे. गेल्या शंभर वर्षातल्या आपल्या तांत्रिक प्रगतीचा आलेख या सगळ्या मोठ्या प्रश्नांच्या उत्तरादाखल देता येतो. त्यामुळे दीर्घकाळ टिकून राहायचे असेल तर आपले भविष्य अंतराळात शोधायला हवे हे नक्की. म्हणूनच मी माणसांचे दळणवळण करू शकणारी अंतराळयाने तयार व्हावीत या विचारांचा आहे.
माझे संपूर्ण आयुष्य मी विश्वाचा विचार करण्यात, वरील प्रश्नांची उत्तरे शोधण्यात घालवले आहे. मी स्वतःला नशीबवान समजतो की माझी विकलांगता अतिशय गंभीर अशा अपंगत्वामध्ये रूपांतरित झाली नाही. खरेतर या अपंगत्वानेच मला इतर माणसांना लाभत नाही इतका वेळ एका जागी बसायला, शांतपणे विचार करून ही विश्वाची कोडी सोडवायला उपलब्ध करून दिला. आपले अंतिम उद्दिष्ट हेच की विश्वाच्या उत्पत्तीचा सर्वांगीण सिद्धांत मांडणे आणि त्या दृष्टीने खरोखरच आपण चांगली प्रगती करीत आहोत.
माझे विचार ऐकून घेतल्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद!


अनुवाद: स्नेहल
संपादन: डॉ. चारुता कुळकर्णी 
संपादन साहाय्य: श्रद्धा चोरगी, सोनल नाईक, अद्वैत गोखले

14 मार्च 2018 या दिवशी ख्यातनाम शास्त्रज्ञ स्टीवन हॉकिंग यांचे निधन झाले. त्यांच्या TED talk चा अनुवाद ही माझी पहिली विज्ञानवेध ब्लॉग पोस्ट- त्यांना आदरांजली म्हणून...

मूळ TED talk ऐकण्यासाठी वेबसाईट लिंक: Stephen Hawking: Questioning the Universe

तळटीप: 'स्टीवन हॉकिंग' यांचे नाव लिहीताना 'स्टीफन' असा लिहिण्याचा प्रघात आहे. परंतु उच्चार ऐकल्यास तो स्टीवन असा केला जातो. तसेच संपादक डॉ. चारुता हिने हा बदल सुचविल्याने स्टीवन हॉकिंग असेच लिहीले आहे.

घोटभर अवकाश आणि एक विचित्र पेच...

लेखक: सोपान जोशी ( इंदौरच्या नई दुनिया दैनिकामध्ये  23 मार्च 2020 रोजी प्रकाशित नवीन लेख) मराठी अनुवाद: स्नेहल नील अगदी सामान्य भा...