Friday, 10 April 2020

घोटभर अवकाश आणि एक विचित्र पेच...

लेखक: सोपान जोशी
(इंदौरच्या नई दुनिया दैनिकामध्ये 23 मार्च 2020 रोजी प्रकाशित नवीन लेख)
मराठी अनुवाद: स्नेहल नील

अगदी सामान्य भारतीय नागरिकापासून ते ज्येष्ठ-श्रेष्ठ वैज्ञानिकांपर्यंत सर्वांनाच पाण्याविषयी एक महत्त्वाचे तथ्य माहिती आहे - पाणी निर्माण करता येत नाही. आधुनिक विज्ञानाने आज कल्पनातीत प्रगती केली आहे. रेणू ज्यापासून बनलेला असतो त्या सूक्ष्म अणूला भेदून त्यातील ऊर्जादेखील आपण काढू शकतो. अनेक नवनवीन रसायनांचा शोध तर लागलेला आहे, निसर्गात न आढळणारी मूलद्रव्येसुद्धा प्रयोगशाळेत तयार करण्यात आली आहेत. आणि तरीही, पाण्याची निर्मिती काही आपण करू शकत नाही.
पाण्याचे रासायनिक सूत्र अगदी मुलांनासुद्धा ठाऊक आहे. हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू यांनी मिळून एचटूओ (H2O) म्हणजेच पाणी तयार होते. ही दोन्ही मूलद्रव्ये मुबलक प्रमाणात आढळतात. ब्रह्माण्डामध्ये तीन चतुर्थांश म्हणजेच 75 टक्के भाग हायड्रोजन आहे. मुबलकतेचा विचार केला तर ऑक्सिजनचा तिसरा क्रमांक लागतो. अशाप्रकारे पाणी तयार करण्याचा कच्चा माल आपल्या चहूबाजूला पुष्कळ प्रमाणात आहे. तरीही शुद्ध पाण्याच्या कमतरतेमुळे पाणी विकणे हा एक मोठा व्यवसाय झाला आहे. या व्यवसायात पाण्याचा भाव पेट्रोलच्या भावापेक्षा जास्तसुद्धा असू शकतो. मग प्रश्न असा की हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिसळून पाणी बनवण्याचे कारखाने आजवर सुरू का झाले नाहीत?
कारण ही दोन्ही मूलद्रव्ये केवळ एकमेकांत मिसळली की काम संपले असे होत नाही. हे करण्याकरिता प्रचंड प्रमाणात स्फोटक ऊर्जा लागेल. इतके मोठे स्फोट घडवून आणले तर इतर बरेच मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळेच खूप साऱ्या प्रयोगांतीसुद्धा पाण्याचे कारखाने काही उभे राहू शकलेले नाहीत.
अंतराळातील मोठमोठ्या ताऱ्यांच्या गर्भात उपलब्ध असलेल्या ऊर्जेचे मोजमाप तर सोडाच पण एवढ्या ऊर्जासाठ्याची कल्पनासुद्धा वैज्ञानिक करू शकत नाहीत. अवकाशातील या राक्षसी ताऱ्यांच्या तुलनेत सूर्य खूप लहान आहे. तरीही एका संपूर्ण दिवसात त्याच्याकडून मिळणारी ऊर्जा एवढी प्रचंड असते जी एका वर्षाच्या अवधीतसुद्धा आपण बनवू शकत नाही. अशाच काहीशा ऊर्जेमुळे अंतराळात हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळून पाणी निर्माण झाले असेल. वैज्ञानिकांचे असेही अनुमान आहे की सूर्यमालेच्या निर्मितीच्या काळात हे पाणी गोठलेल्या बर्फाच्या रुपात उल्कांमार्फत पृथ्वीवर आले असेल.
आज पृथ्वीवर उपलब्ध असलेले पाणी तेव्हापासून आजतागायत आपल्या ग्रहावर आहे. आज आपल्या शरीरात रक्ताच्या रुपात वाहणारे थेंब कदाचित प्राचीन काळातील डायनॉसोरच्या शरीरातदेखील होते. तेच थेंब प्राण्यांच्या लघवीवाटे आणि घामावाटे नदीतून समुद्रापर्यंत पोहोचून वाफ बनून ढगांच्या साह्याने पृथ्वीवर परततात. कदाचित तेच पाण्याचे थेंब अंटार्क्टिकावरील हिमनगामध्ये असतील आणि कधीतरी भूमध्यरेषेच्या वरच्या भागातील एखाद्या फुलावरच्या दवबिंदूच्या स्वरुपात भ्रमंती करीत असतील. तुम्ही आज सकाळी प्यायलेल्या पाण्यात घोटभर अवकाशसुद्धा मिसळलेले असेल...
पाणी आपण बनवू शकत नाही. आणि म्हणूनच त्याचा वापर अधिक जबाबदारीने करणे गरजेचे आहे. गावागावातील, खेड्यापाड्यातील लोकांना पाण्याच्या अवकाशातील प्रवासाविषयी माहिती असेल नसेल, पण जबाबदारीची ही शिकवण त्यांना आधीपासूनच मिळालेली होती. पाण्याच्या स्रोतांना वेगळाच मान होता. पाण्यासाठी लोक नद्या आणि विहिरींपर्यंत जायचे. कृतज्ञतेचा भाव मनाशी बाळगूनच ते पाण्याचा वापर करायचे. विकासाच्या या युगात पाईप्सच्या माध्यमातून जलस्रोत थेट लोकांपर्यंत पोहोचले आहेत. आजच्या समाजातील एक मोठा वर्ग नद्या-तलाव-विहिरी यांच्यापर्यंत जातच नाही. नळाच्या रुपात पाण्याचे स्रोतच त्यांच्या दारापर्यंत पोहोचले आहेत. आज यालाच आदर्श व्यवस्था मानले जाते. प्रत्येक घराला नळाद्वारे पाणीपुरवठा झाला पाहिजे यासाठी सरकारसुद्धा प्रयत्न करत आहे. अशी सोय कोणाला नकोशी वाटेल म्हणा!
वापरलेल्या एकूण पाण्यापैकी 80 टक्के पाणी मैलापाण्याच्या रुपात गटारांमध्ये वाहून जाते. स्वस्त आणि सोयीने मिळणाऱ्या पाण्याचाच हाच खरा पेच आहे. असे पाणी स्वच्छ करण्याचा प्रपंच अतिशय महागडा आहे. पाणी मिळवण्यासाठी आपण वारेमाप खर्च करायला तयार असतो. आजकाल तथाकथित प्रतिष्ठित घरांमध्ये पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी महागडी यंत्रे बसवलेली दिसून येतात. करोडो रुपयांच्या विशाल पाईपलाईनच्या आणि पंपिंगस्टेशनच्या मदतीने दूर प्रदेशातील पाणी खेचून आपण शहरात आणतो. परंतु मैलापाणी साफ करण्यासाठी ना नागरिकांना पैसा द्यावासा वाटतो, ना नगरपालिकांना, ना सरकारला! कृतघ्न झालेला समाज एका विचित्र अशा पेचात अडकलेला आहे...
आपण निर्माण केलेली घाण मैलापाण्याद्वारे सरळ नद्यांमध्ये किंवा भूजलामध्ये मिसळली जाते. यामुळे देशभरातील नद्या आणि तलाव म्हणजे मोठी गटारे झाली आहेत. स्वच्छता अभियानातील स्वच्छतेची किंमत या जलस्रोतांनाच चुकवावी लागते. खूपशा गावांच्या आणि शहरांच्या भूजलामध्ये मलमूत्राचे कण आढळू लागले आहेत. दिवसेंदिवस ही समस्या उग्र रूप धारण करीत आहे. दुर्दैवाने, पाण्याच्या स्रोतांचे रुपांतर गटारात झाल्यानंतरच त्यांच्या स्वच्छतेच्या चर्चा घडायला लागतात. नद्यांच्या स्वच्छतेसाठी हजारोकोटी रुपये खर्चदेखील झालेले आहेत पण नद्या स्वच्छ झालेल्या नाहीत. कारण ‘कृतघ्न’ विकासाच्या नावावर यापेक्षा कितीतरी अधिक खर्च लाखांमध्ये-कोटींमध्ये केले जात आहेत.
गंगेचे आणि दिल्लीतील यमुनेचे रुपांतर गटारात होऊन बराच काळ लोटला आहे. धरणांनी वेढलेल्या नर्मदेमधील पाणी आटले आहे. वेगवेगळ्या परंपरांच्या/ धार्मिक कार्यक्रमांच्या नावाने ह्या नद्या स्वच्छ करण्याच्या शपथा घेतल्या जातात. ह्यांच्या किनाऱ्यांवर बांधण्यात येणारे सिमेंट कॉंक्रिटचे घाट म्हणजे विकासात्मक कार्य आणि धार्मिक यज्ञकर्म असल्याचे सांगितले जाते. जणू काही नद्यांचे नाते पूर्वीपासून जमीन आणि मातीशी नव्हे तर सिमेंट कॉंक्रिटशीच होते. ह्या नद्या नसून नालेच असावेत जणू! विकासाच्या या कृतघ्न नजरांना कदाचित भगीरथ ऋषीसुद्धा ठेकेदारच वाटत असणार!
सर्वांना माहिती आहे की 30 वर्षांपासून सुरु असलेल्या नदी स्वच्छता योजना आणि त्याविषयक कार्यक्रम हे एक ढोंग आहे. मोठ्या नद्यांच्या स्वच्छतेसाठी ‘मॉडेल’ म्हणून लहान-सहान नद्यांच्या स्वच्छतेचे नमुने सादर केले जातात. नद्यांवर इतकी चर्चा होण्याचे कारण म्हणजे हा अत्यंत सोयीचा विषय आहे. विविध संस्कृतींचा उदय नद्यांच्या काठाकाठाने होत गेला तो सोयीसुविधांसाठीच! आधुनिक संशोधनानुसार असे आढळून आले आहे की नदीकिनारी वस्ती करणे हे मानवी इतिहासात अगदी अलीकडेच घडून आलेले आहे. पृथ्वीवरील एकूण अस्तित्वापैकी मानवाचा बराच काळ नद्यांपासून दूर व्यतीत झाला आहे. आपल्या धार्मिक परंपराच पाहूया. आस्तिक परंपरेनुसार ऋषींचे आश्रम जंगलांमध्ये असत. नास्तिक परंपरेतील तपस्वीसुद्धा तपश्चर्या करायला जंगलांमध्येच जात असत.
समाजामध्ये नद्या-तलावांची पूजा करण्याची प्रथा तर दिसून येते. पण त्याच्या नजरा मात्र ढगाकडे रोखलेल्या आढळून येतात. राजस्थानसारख्या शुष्क प्रदेशात ढगांची अनेक नावे प्रचलित आहेत. त्यातील 40 नावांचा उल्लेख तर सामाजिक पत्रकार अनुपम मिश्र यांनी त्यांच्या पुस्तकातच केलेला आहे. समाजाला कदाचित याचे ज्ञान होते की जमिनीवर उपलब्ध पाणी समुद्राकडून ढगांच्या रूपानेच आलेले आहे. गोस्वामी तुलसीदास यांनी म्हटले आहे, “सरिता जल जलनिधि महुँ जाई। होई अचल जिमि जिव हरि पाई॥”
जोवर आपल्याला आपल्या मर्यादांची जाणीव होती तोवर स्वतःच्या विकासाला निसर्गाच्या कलांप्रमाणे मर्यादित राखणे ही समज आपल्यात होती. अमर्यादित विकासाची बेलगाम वासना तेव्हा आपल्यामध्ये नव्हती. माणूस सोयीसुविधांच्या संमोहनाखाली नव्हता. उलट गैरसोयी किंवा सुविधांचा अभावसुद्धा आपलासा करण्याचा पुरुषार्थ आपल्याकडे होता. इच्छा असेल तर आपल्या पूर्वजांकडून आजही आपण शिकू शकतो. आधुनिक विज्ञानसुद्धा हेच तर सांगते आहे. पाणी आपल्याला तयार करता येत नाही. निदान पाण्याची लूट करणे आणि ते वाया घालवणे हे तरी आपण थांबवूया!!

अनुवादित लेख 'आजचा सुधारक' या ऑनलाईन मासिकामध्ये प्रसिद्ध झाला आहे. त्याची लिंक: आजचा सुधारक

Tuesday, 20 March 2018

विश्वाची कोडी सोडवताना... (स्टीवन हॉकिंग यांच्या TED talk चा अनुवाद)

आपल्या विश्वापेक्षा, या ब्रह्मांडापेक्षा अजस्त्र आणि पुरातन असं काहीच नाही. या संदर्भात मला ज्या खास कोड्यांवर-प्रश्नांवर बोलायला आवडतं, ते म्हणजे : ही पृथ्वीवरची जीवसृष्टी कुठून आली? विश्वाची उत्पत्ती कशी झाली? या विश्वात आपण एकटेच आहोत का? की पृथ्वीपलीकडेही जीवसृष्टी अस्तित्वात असेल? मानवजातीचं भवितव्य आहे तरी काय?
अगदी 1920 पर्यंत आपला असा समज होता की विश्व स्थिर आहे, त्यात कालानुरूप बदल होत नाहीत. मात्र संशोधनानंतर लक्षात आले की विश्व हे सतत प्रसरण पावत आहे. आपल्यापासून कित्येक प्रकाशवर्षे अंतरांवर असणाऱ्या आकाशगंगा आपल्यापासून अधिकाधिक दूरच जात राहिल्या आहेत. याचाच अर्थ, कधीकाळी त्या एकमेकांच्या जवळ, आत्तापेक्षा कमी अंतरावर असल्या पाहिजेत. अब्जावधी वर्षांच्या भूतकाळात डोकावून पाहिलं तर लक्षात येतं की या सगळ्या अवकाशीय गोष्टी एकेकाळी चक्क एकमेकींना चिकटून होत्या, साधारण 15 अब्ज वर्षांपूर्वी एकाच बिंदूत एकवटल्या होत्या... हेच ते ‘बिग-बँग’, विश्वाच्या उत्पत्तीचा क्षण!
पण या बिग-बँगच्या ही आधी काही होतं का? जर नसेल तर विश्वाची निर्मिती कशी झाली? ती “बिंग बँग”च्या रुपात झाली तर झाली पण मग ती आता आपल्याला दिसते तशीच का झाली? आपल्याला असं वाटायचं की विश्वाच्या निर्मितीच्या सिद्धांताचे दोन भाग होऊ शकतात. पहिल्या भागात,  मॅक्सवेलची समीकरणे (Maxwell’s Equations) आणि सामान्य सापेक्षता सिद्धांत (General Theory of Relativity) आपल्याला विश्वाच्या उत्पत्तीची गणिते, त्याची एका बिंदूत एकवटलेली अवस्था समजावून देतात. पण त्याला पूरक असणारा दुसरा भाग म्हणजे विश्वाची अगदी सुरुवातीची अवस्था कशी होती याबद्दलचा प्रश्न, जो अजूनही चर्चेत नव्हता.
पहिल्या भागासंदर्भात बोलायचे झाले तर आपण त्यात चांगली प्रगती केली आहे. काही मोजक्या-टोकाच्या अवस्था वगळल्या तर आपल्याकडे विश्वाच्या उत्क्रांतीच्या नियमांविषयी बरेच ज्ञान आहे. परंतु अगदी आता-आतापर्यंत विश्वाच्या अगदी सुरुवातीच्या स्थितीबद्दल आपल्याला फार काही सांगता येत नव्हतं. पण विश्वाच्या उत्क्रांतीचे नियम आणि विश्वाची सुरुवातीची अवस्था ही विभागणी, काळ (Time) आणि अवकाश (Space) या एकमेकांपासून पूर्ण वेगळ्या आणि स्वतंत्र संकल्पना आहेत यावर अवलंबून आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर अगदी टोकाच्या अवस्थेत सामान्य सापेक्षता सिद्धांत आणि पुंजवाद (Quantum Theory) हे काळ हा अवकाशाचाच एक आयाम असल्याचे सांगतात. त्यामुळे या स्थितीत काळ आणि अवकाश यात काही फरकच उरत नाही आणि विश्वाच्या उत्क्रांतीचे नियम आपल्याला विश्वाच्या सुरुवातीच्या स्थितीबद्दलही सांगू शकतात. (म्हणजे) विश्व स्वतःचे स्वतः शून्यातून निर्माण होऊ शकते.
महत्वाचे म्हणजे विश्वाची निर्मिती ज्या निरनिराळ्या टप्प्यांमध्ये झाली, त्यांची शक्याशक्यता आपण गणिती भाषेत मांडू शकतो. शिवाय, अलीकडेच WMAP उपग्रहाने “कॉस्मिक मायक्रोव्हेव बॅकग्राऊँड”च्या स्वरुपात विश्वाच्या मुलभूत अवस्थांबद्दल महत्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. आपण वर्तवलेले गणिती आडाखे आणि WMAP ची निरीक्षणे अगदी तंतोतंत जुळतात, यातून विश्वाच्या प्राथमिक अवस्थांबद्दलचा आपला अंदाज आणखी सबळ होत जातो. विश्वनिर्मितीचे कोडे हे आपण अशारितीने सोडवत आणले आहे, त्यामुळे मला वाटते की आपण या विश्वाचे पेटंट घ्यायला हवे की काय! तसे केले तर प्रत्येकाकडून स्वत:च्या अस्तित्वासाठी घाऊक शुल्क आकारायला हवेच!
आता मी दुसऱ्या एका मोठ्या प्रश्नाकडे वळतो: या विश्वात आपण एकटेच आहोत का? की जीवसृष्टी आणखी कुठे अस्तित्वात आहे? पृथ्वीवर जीवनाची सुरुवात उत्स्फूर्तपणे झाली असे आपण मानतो.त्यामुळे इथे अस्तित्वात यायला, जगायला अनुकूल असलेली परिस्थिती इतर ग्रहांवर असायला आणि त्यातले अनेक (ग्रह) आपल्या आकाशगंगेत असायलाही (गणितीदृष्ट्या) काहीच हरकत नाही.
पण पहिला जीव कसा तयार झाला या विषयी आपण अनभिज्ञ आहोत. जीवनाची सुरुवात कशी झाली याच्या शक्यता दर्शवणारे दोन प्रत्यक्षदर्शी पुरावे आपल्याकडे आहेत. पहिला पुरावा म्हणजे 3.5 अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या शैवालाचे जीवाश्म. पृथ्वीची निर्मिती साधारण 4.6 अब्ज वर्षांपूर्वी झाली खरी पण सुरुवातीची 50 कोटी वर्षे ती खूपच उष्ण अवस्थेत होती. त्यामुळे त्या काळात जीवनाची शक्यता उद्भवत नाही, पण त्यानंतर काही काळातच पृथ्वीवर जीवनाची सुरुवात व्हायला काही हरकत नव्हती आणि तसे झालेले दिसतेही. पृथ्वीसारख्या ग्रहांचे 10 अब्ज वर्षं वगैरे कालावधीचे आयुष्य लक्षात घेता इथे जीवसृष्टीची सुरुवात फारच लवकर झाली. म्हणूनच गणितीच्या दृष्टीने पहायचे झाले तर पृथ्वीसारख्या इतर ग्रहांवरदेखील जीवन असण्याची शक्यता जास्त आहे. ही शक्यता खरोखरच अगदी कमी असती तर या 10 अब्ज वर्षांपैकी बराचसा काळ जीवनाची सुरुवात होण्यामध्येच गेला असता. पण आपल्याकडचे सर्व पुरावे पाहता तसे दिसत नाही.
असे असतानाही एकाही परग्रहवासियाने आपली अजून तरी भेट घेतलेली नाही. उडत्या तबकड्या/ यु.एफ.ओ. (Unidentified Flying Object) संबंधित बातम्यांना मी अर्थातच मोडीत काढतो आहे. अशा गोष्टी फक्त विचित्र, विक्षिप्त लोकांनाच का बरे दिसतात? हेच माझ्यासाठी एक मोठे कोडे आहे! जर असे रिपोर्ट दडपून टाकणे आणि परग्रहवासियांनी सोबत आणलेली वैज्ञानिक माहिती स्वतःपुरतीच राखून ठेवणे असे काही सरकारी षड्यंत्र असेल तर हे आतापर्यंतचे विलक्षण निरुपयोगी धोरण आहे असेच म्हणावे लागेल. SETI (Search for extraterrestrial Intelligence) सारख्या अत्याधुनिक शोधमोहिमांनी जंग-जंग पछाडूनसुद्धा परग्रहवासियांच्या एकाही दूरदर्शन ‘क्विझ शो’बद्दल आतापर्यंत ऐकायला मिळालेले नाही! यावरून म्हणता येईल की निदान शंभरेक प्रकाशवर्षे त्रिज्येच्या अंतरात तरी ‘आपल्या एवढा विकासाचा टप्पा गाठणारे’ परग्रहवासी कदाचित अस्तित्वात नाहीत. त्यामुळे "उद्या तुमचे परग्रहवासियांकडून अपहरण झाले तर! त्यासाठी आधीच विमा उतरवून घ्या." अशी जाहिरात करून विमा कंपन्यांनी विमे विकायला सुरुवात केली तरी त्या अजिबात घाट्यात जाणार नाहीत...!
आता मी एका शेवटच्या प्रश्नाकडे येतो: मानवजातीचे भवितव्य काय? जर आपण खरोखरच या आकाशगंगेतील एकमेव बुद्धिमान जीव असू तर आपले अस्तित्व कायम टिकून राहील अशी व्यवस्था आपणच केली पाहिजे. परंतु आपण तर मानवी इतिहासाच्या अतिशय धोकादायक काळात प्रवेश करत आहोत. आपली लोकसंख्या आणि पृथ्वीवरील मर्यादित स्त्रोतांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढत चाललेत. त्याचबरोबर आपल्या तांत्रिक कौशल्याच्या जोरावर आपण पर्यावरणामध्ये चांगले-वाईट बदल घडवून आणत आहोत. जगण्या-वाचण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत स्वार्थी आणि आक्रमक वृत्ती इतर सजीवांइतक्याच आपल्या जनुकांमध्येही पहिल्यापासून होत्या आणि त्या आजही तितक्याच टिकून आहेत. त्यामुळे येत्या काही शतकांमध्ये येऊ घातलेल्या आपत्ती टाळणे कठीण आहे, मग पुढच्या हजारो किंवा लाखो वर्षांची तर गोष्टच सोडा.
माझ्या मते, मानवजातीच्या दीर्घायुष्यासाठी एकच संधी आहे, ती म्हणजे फक्त पृथ्वीपुरता मर्यादित विचार न करता वास्तव्यासाठी अंतराळाचाही विचार करणे. गेल्या शंभर वर्षातल्या आपल्या तांत्रिक प्रगतीचा आलेख या सगळ्या मोठ्या प्रश्नांच्या उत्तरादाखल देता येतो. त्यामुळे दीर्घकाळ टिकून राहायचे असेल तर आपले भविष्य अंतराळात शोधायला हवे हे नक्की. म्हणूनच मी माणसांचे दळणवळण करू शकणारी अंतराळयाने तयार व्हावीत या विचारांचा आहे.
माझे संपूर्ण आयुष्य मी विश्वाचा विचार करण्यात, वरील प्रश्नांची उत्तरे शोधण्यात घालवले आहे. मी स्वतःला नशीबवान समजतो की माझी विकलांगता अतिशय गंभीर अशा अपंगत्वामध्ये रूपांतरित झाली नाही. खरेतर या अपंगत्वानेच मला इतर माणसांना लाभत नाही इतका वेळ एका जागी बसायला, शांतपणे विचार करून ही विश्वाची कोडी सोडवायला उपलब्ध करून दिला. आपले अंतिम उद्दिष्ट हेच की विश्वाच्या उत्पत्तीचा सर्वांगीण सिद्धांत मांडणे आणि त्या दृष्टीने खरोखरच आपण चांगली प्रगती करीत आहोत.
माझे विचार ऐकून घेतल्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद!


अनुवाद: स्नेहल
संपादन: डॉ. चारुता कुळकर्णी 
संपादन साहाय्य: श्रद्धा चोरगी, सोनल नाईक, अद्वैत गोखले

14 मार्च 2018 या दिवशी ख्यातनाम शास्त्रज्ञ स्टीवन हॉकिंग यांचे निधन झाले. त्यांच्या TED talk चा अनुवाद ही माझी पहिली विज्ञानवेध ब्लॉग पोस्ट- त्यांना आदरांजली म्हणून...

मूळ TED talk ऐकण्यासाठी वेबसाईट लिंक: Stephen Hawking: Questioning the Universe

तळटीप: 'स्टीवन हॉकिंग' यांचे नाव लिहीताना 'स्टीफन' असा लिहिण्याचा प्रघात आहे. परंतु उच्चार ऐकल्यास तो स्टीवन असा केला जातो. तसेच संपादक डॉ. चारुता हिने हा बदल सुचविल्याने स्टीवन हॉकिंग असेच लिहीले आहे.

घोटभर अवकाश आणि एक विचित्र पेच...

लेखक: सोपान जोशी ( इंदौरच्या नई दुनिया दैनिकामध्ये  23 मार्च 2020 रोजी प्रकाशित नवीन लेख) मराठी अनुवाद: स्नेहल नील अगदी सामान्य भा...